ह्या पोरी अशा का असतात कळत नाही!
स्वतःहुन बागेत चल म्हणतात,
निर्मनुष्य कोपराही स्वतःच शोधुन काढतात.
मात्र तो जरासा जवळ आला,
की ह्यांचा त्रागा सुरु होतो.
मग त्या निर्मनुष्य कोपऱ्याचं प्रयोजन काय तेच
कळत नाही,
ह्या पोरी अशा का असतात कळत नाही!
ह्यांची खरेदी म्हणजे जणु आणीबाणीच!
जणु काही यांच्या वस्तु सीमेवर लढण्यासाठी वापरणार,
इतके निकष लावुन सगळी उलथापालथ.
मात्र त्याने एखादी अजिबात न आवडणारी वस्तु जरी भेट दिली,
तरी हिच्या चेहऱ्यावरचा आनंद काही केल्या लपत नाही.
ह्या पोरी अशा का असतात कळत नाही!
ह्यांना खोटेपणाची भयंकर चीड!
राजा हरिश्चंद्राच्या शिष्याच ह्या जशा काही!
उशीरा येण्याचं त्याने खोटं कारण दिलं तर त्याची हजामत ठरलेलीच.
पण स्वतःचं दुःख लपवण्यासाठी खोटं बोलायला ह्यांची जीभ वळते कशी कळत नाही.
ह्या पोरी अशा का असतात कळत नाही!
ह्यांना आपल्या स्त्रीशक्तीचा भलताच गर्व,
कधी चंडिका पर्व चालु असते तर कधी कालीमाता पर्व,
समोर साक्षात यम आला तरी रेडा सोडुन पळुन जाइल
इतका यांचा दरारा.
मात्र सुरीची कड अलगद बोटाला चाटुन गेली
तरी ह्यांच्या डोळ्यातली धार काही थांबता थांबत नाही.
ह्या पोरी अशा का असतात कळत नाही!
ह्यांच वागणं नेहमीच अवखळ,
जणु काही निरागसतेच्या मुर्तिमंत देवताच या!
यांना बाहेर घेउन जाणं म्हणजे पोराच्याच डोक्याला ताप!
पण जर त्याचं काही बिनसलं,
तर त्याची समजुत काढताना ह्या अचानक
प्रौढ कशा होतात कळत नाही.
ह्या पोरी अशा का असतात कळत नाही!
ह्यांच्या मनाचा ठाव घेणं सर्वथा अशक्य!
तसा प्रयत्न करणारा खोल खोल बुडावा
आणि स्वतःलाच विसरुन जावा,इतकं हे अद्भुत.
काळ्या अंधाऱ्या गुहेहुनही रहस्यमयी
असं हे प्रकरण!
मात्र तरीही ते नेहमीच ’स्वच्छ पारदर्शी’ का
वाटतं कळत नाही!
ह्या पोरी अशा का असतात कळत नाही!