Tuesday, May 17, 2011

गझल(पहिला प्रयत्न )

एकलीच वाट माझी, एकटा मी चालतो.
एकटा हा सुर्य आता पश्चिमेला धावतो.

एकटा हा जीव कोठे,न कुठेही थांबतो.
सुख आणि दुःखं सारे,पिउनी हा धावतो.

सावल्या ह्या भोवती आल्या किती छेडावया.
गावते हे धड माझे,मी परि न गावतो.

काळोख हा अंतरीचा,व्य़ापतो जग सारे.
अंधुक त्या आशेच्या, किरणावर मी रांगतो.

संकटे ही माणसांची. नाचती मजभोवती.
झिंगलेला सुर्य मी,त्या एकएकां जाळतो.

Thursday, April 14, 2011

ह्यांचं काही कळत नाही...



ह्या पोरी अशा का असतात कळत नाही!

स्वतःहुन बागेत चल म्हणतात,
निर्मनुष्य कोपराही स्वतःच शोधुन काढतात.
मात्र तो जरासा जवळ आला,
की ह्यांचा त्रागा सुरु होतो.
मग त्या निर्मनुष्य कोपऱ्याचं प्रयोजन काय तेच
कळत नाही,
ह्या पोरी अशा का असतात कळत नाही!

ह्यांची खरेदी म्हणजे जणु आणीबाणीच!
जणु काही यांच्या वस्तु सीमेवर लढण्यासाठी वापरणार,
इतके निकष लावुन सगळी उलथापालथ.
मात्र त्याने एखादी अजिबात न आवडणारी वस्तु जरी भेट दिली,
तरी हिच्या चेहऱ्यावरचा आनंद काही केल्या लपत नाही.
ह्या पोरी अशा का असतात कळत नाही!

ह्यांना खोटेपणाची भयंकर चीड!
राजा हरिश्चंद्राच्या शिष्याच ह्या जशा काही!
उशीरा येण्याचं त्याने खोटं कारण दिलं तर त्याची हजामत ठरलेलीच.
पण स्वतःचं दुःख लपवण्यासाठी खोटं बोलायला ह्यांची जीभ वळते कशी कळत नाही.
ह्या पोरी अशा का असतात कळत नाही!

ह्यांना आपल्या स्त्रीशक्तीचा भलताच गर्व,
कधी चंडिका पर्व चालु असते तर कधी कालीमाता पर्व,
समोर साक्षात यम आला तरी रेडा सोडुन पळुन जाइल
इतका यांचा दरारा.
मात्र सुरीची कड अलगद बोटाला चाटुन गेली
तरी ह्यांच्या डोळ्यातली धार काही थांबता थांबत नाही.
ह्या पोरी अशा का असतात कळत नाही!

ह्यांच वागणं नेहमीच अवखळ,
जणु काही निरागसतेच्या मुर्तिमंत देवताच या!
यांना बाहेर घेउन जाणं म्हणजे पोराच्याच डोक्याला ताप!
पण जर त्याचं काही बिनसलं,
तर त्याची समजुत काढताना ह्या अचानक
प्रौढ कशा होतात कळत नाही.
ह्या पोरी अशा का असतात कळत नाही!

ह्यांच्या मनाचा ठाव घेणं सर्वथा अशक्य!
तसा प्रयत्न करणारा खोल खोल बुडावा
आणि स्वतःलाच विसरुन जावा,इतकं हे अद्भुत.
काळ्या अंधाऱ्या गुहेहुनही रहस्यमयी
असं हे प्रकरण!
मात्र तरीही ते नेहमीच ’स्वच्छ पारदर्शी’ का
वाटतं कळत नाही!
ह्या पोरी अशा का असतात कळत नाही!

Saturday, April 9, 2011

सागर किनारा

बलाकमाला उडता जाते,घेउनि येते सांजवेळ​,
तुझ्या नि माझ्या भावनांचा या, बसतो तेव्हा चपखल मेळ​.

ओबडधोबड पाषाणातही दिसु लागतात मग आकार​,
कुठे कुठे ती वेडी राधा तर कुठे तो निळा निर्विकार​.

समोर सागराची प्रीती अन् मिठीत प्रीतीचा सागर​,
लाभता ऐश्वर्य ऐसे, दिव्य भासते सकल चराचर​.

लाटांमधुनि स्वैर नाचतो अल्लड अवखळ हा वारा,
भान हरपुनि वाहतो,उत्कट प्रेमाविष्काराचा झरा.

Thursday, March 31, 2011

त्या दिवशी पाउस होता...

परवा परवाचीच गोष्ट,
मित्रांबरोबर पायी फ़िरायला निघालो,
फिरत फिरत शाळेसमोरच्या रस्यावर पोचलो.
निवांत चालत असताना अचानक पाय थबकले.
शेजारच्या उजवीकडल्या बोळीत अलगद शिरले.
शिरताक्षणी पायाची चाल मंदावली.

पायाच्या चालीबरोबर काळ मंदावत गेला.
ती बोळ...अजुनही तशीच आहे.
समोरच्या भींतीवरचा रंग उडालेला,
बाजुच्या त्या खिडकीची काच अजुनही तशीच...तडे गेलेली.
खिडकीच्या छज्ज्यावरचं ते घरटं मात्रं काळानं खाउन टाकलेलं.
आणि....आणि त्यावर असलेली ती गच्ची!
गच्चीशेजारची ती छोटीशी खिडकी!!

कितीतरी वेळा मन शाळॆतुन उडुन या गच्चीवर बसलेलं,
तिची एक झलक पाहण्यासाठी आसुसलेलं.
आज का बरं आली नसेल ती शाळेत?
बरं नसेल का तिला?
का ग्रुहपाठ झाला नसेल?
मनाचा पक्षी उत्तर शोधत तिच्या खिडकीत जाउन बसायचा.

मंदावत चाललेला काळ कधीच थांबला होता.
आता उलट्यापावली भराभरा मागे पळत होता...

तिचं ते दोन सुंदर वेण्या घालुन येणं,
त्या वेण्य़ांबरोबर माझ्य़ा मनानं सुरपारंब्या खेळणं.
तिचं ते हळु आवाजात उत्तर सांगणं,
आणि तो आवाज कानाच्या आणि मनाच्या कुपीत सांभाळण्याचा माझा जीवापाड प्रयत्न करणं.
तिचं ते स्वच्छंदी,पैंजण वाजवत चालणं,
आणि माझ्या ह्रुदयाच्या ठोक्यांनी पैंजणाच्या ’छुम छुम’ बरोबर जुगलबंदी खेळणं.

सगळं किती सहज सुंदर निरागस!

त्या दिवशी खुप पाउस पडत होता.
शाळा सुटली.
ती थांबली होती, घाबरलेली थोडीशी.
छत्री नाही! पावसाची जाम भीती चेहऱ्यावर.
’हीच ती वेळ हाच तो क्षण’,माझ्या मनाचा आवाज.
"माझ्याकडे छत्री आहे,माझ्या वाटेवर तुझं घर आहे."
मी सांगायचं ते सांगितलं,ती समजायचं ते समजली.....
....त्या पंधरा मिनीटांत मी पावसांत निम्मा
आणि भावनांनी चिंब भिजुन गेलो.

पावसाची ओल ओसरुन गेली.
भावनांची ओल मात्र शाबुत अहे अजुनही.
आज ती बाहेर पडली डोळ्यांतुन.

शाळेचा शेवटच्या दिवसाचा हा प्रसंग,
नंतर कधीच दिसली नाही ती.
पण म्हणुन मनातलं तिचं अस्तित्व आजही किंचितही पुसट झालेलं नाही.
आयुष्यभराचा ठेवा ती त्या क्षणांमधे देउन गेली.
कोण जाणे कदाचित,,,
असाच ठेवा तिनेही जपला असेल तिच्या मनात,
माझ्या नकळत.....

Friday, March 25, 2011

कविता

हे कवितेचं फार अवघड आहे हो!
अंगाला तेल लावलेल्या पैलवानासारखं
हातात आली म्हणता म्हणता सटकुन जाते.

अगदी हाताच्या बोटापर्यंत काहीतरी पोचतं
पण लेखणीतुन कागदावर उतरायचं रहातं
उतु जाणाऱ्या शब्दांनी मग मनाची मळमळ चालु होते.

मग व्युवहरचना करावी लागते
एक एक शब्दाला फितुर करावे लागते
आंजारुन गोंजारुन ओळीला नमवावे लागते.

खुप कष्टांनंतर शब्दांचा गोतावळा जमतो
पण त्यांना जोडायचं कसं?
इथं विषयाचाच पत्ता नसतो!

चुळ्बुळणारे शब्द अस्वस्थ होऊन ढुसण्या देतात एकमेकांना
पळतात नुसते इकडं तिकडं वर खाली
काही हातात हात घालुन फेर धरतात.

अशातच कुठुनतरी अचानक विषय टपकतो
त्याच्या मागं असते मोठ्ठी शेपटी,हनुमानासारखी...
त्याला आपोआप चिकटतात सगळे शब्द,गोचिडासारखे...

एकदा चिकटले की मग हलवायचं म्हटलं तरी हलत नाहीत
पण गरजंच पडत नाही हलवायची
विषयाची ओढच असते एवढी
की अर्थ आपोआप चालुन येतो त्यांच्या पायाशी.

इतके कष्टं पडतात एक कविता करायला
कष्टं तसे शब्दांचे, पण श्रेयं मात्र कवीला
पण कवितेला श्रेयाचं घेणं देणं नसतं
तिचं कर्तव्य फक्त प्रेम देणं घेणं असतं.

एकदा उतरली कागदावर की तीन आत्मे त्रुप्त होतात
लिहीणारा आत्मा दिल्याने त्रुप्त होतो
वाचणारा आत्मा मिळाल्याने त्रुप्त होतो
कवितेचा आत्मा धर्मपालनाने त्रुप्त होतो.

Wednesday, March 23, 2011

पसारा

पसारा वाढतंच चाललाय,
पुस्तकांवर पुस्तकं चढतंच आहेत,
कोपर्‍यातली रद्दी हळुहळु पाय पसरायला लागलीये,
काचेवरच्या धुळीत डास कुस्ती खेळायला लागलेत,
परवाच्या जेवणातली शितं मुंग्यांनी सफ़ाचट करुन टाकलीयेत,
चला,तेवढंच अन्नदानाचं पुण्यं लाभलं पडल्या पडल्या.

सगळं कसं जडशीळ झालंय,
टीव्ही म्हणता रिमोट उचलवत नाही,
रेडिओ म्हणता कळ फ़िरववत नाही,
नुसतं सोफ़्यावर पडुन कुस्ती बघायची डासांची,
ऎकु वाटल्यास गुंगुं ऐकायची माश्यांची.

खिडकीत मस्त पक्षी बसलाय,
मनातच कौतुक केलं त्याचं,
पण गेला लगेच उडुन तो,
म्हणाला,नको रे बाबा माझं कौतुक करु,
कौतुकाचे कष्ट घ्यायला भाग पाडल्याबद्दल,
देशील मला शिव्याशाप.

स्थुलत्वाच्या सीमा मी केव्हाच पार केल्यात,
बधीरतेच्या कसोट्या कोळुन प्यायल्यात,
दगडाचे गुणधर्म मी पटापट आत्मसात करतोय,
शरीराबरोबर मनसुद्धा दगडात बदलवतोय.

आता नाही जाणवत संवेदना कसल्याच,
आता थंडीही वाजत नाही,गरमही होत नाही,
निष्पाप म्रुत्युच्या बातम्या ऐकुन पेटुन उठायला होत नाही.

चावला ढेकुण तरी म्हणतो चावुन घे,
या थंड रक्ताला तसाही काही अर्थ नाही,
माझ्या जीवावर निदान तु तरी जगुन घे.