(यातली ’ती’ फ़क्त कोणी एक पावसात भिजणारी किंवा पावसात एकाच छत्रीत सोबत करणारी ’ती’ नाहीये. यातली ’ती’ जन्मदात्री आहे.यातली ’ती’ रक्षाबंधनाच पावित्र्य जपणारी आहे.यातली ’ती’ सखी आहे.यातली ’ती’ पतिव्रता आहे.जर फ़क्त’ती’ या शब्दाची व्याप्ती इतकी असेल तर ह शब्द प्रत्यक्ष जिच्यासाठी वापरला गेलाय यातली तिची व्याप्ती,तिच महत्व किती असेल!)
’ती’ आहे प्रत्येक जा’ती’-प्रजा’ती’ मध्ये,
’ती’ आहे भिजलेल्या मा’ती’मध्ये.
'ती' आहे धनुष्यातुन सुटलेल्या ’ती’रामध्ये,
'ती' आहे तलवारीच्या धारदार पा’ती’मध्ये.
’ती’ आहे परंपरानिष्ठ स’ती’मध्ये,
’ती’ आहे विज्ञाननिष्ठ प्रग’ती’मध्ये.
’ती’ म्हणजे अप्सरेची कोमल नाजुक कां’ती’,
’ती’ म्हणजे मंदिराच्या गाभाऱ्यातली धीरगंभीर शां'ती'.
’ती’ लपते वाड्य़ाच्या पडक्या भिं’ती’मध्ये,
’ती’ लपते त्यावर उमललेल्या शेवं’ती’मध्ये.
’ती’ची अशक्य आहे गण’ती’,
’ती’ म्हणजे असंख्य मितींची भुमि’ती’.
’ती’ आहे अंधार दूर सारणारी पण’ती’,
’ती’ आहे वादळातही न विझणारी ज्योत मिणमिण’ती’.
’ती’ आहे जगाच्या सुरुवा’ती’ला,
’ती’ आहे जगाच्या अं’ती’....