Monday, April 1, 2013

ती


(यातली ’ती’ फ़क्त कोणी एक पावसात भिजणारी किंवा पावसात एकाच छत्रीत सोबत करणारी ’ती’ नाहीये. यातली ’ती’ जन्मदात्री आहे.यातली ’ती’ रक्षाबंधनाच पावित्र्य जपणारी आहे.यातली ’ती’ सखी आहे.यातली ’ती’ पतिव्रता आहे.जर फ़क्त’ती’ या शब्दाची व्याप्ती इतकी असेल तर ह शब्द प्रत्यक्ष जिच्यासाठी वापरला गेलाय यातली तिची व्याप्ती,तिच महत्व किती असेल!)


’ती’ आहे प्रत्येक जा’ती’-प्रजा’ती’ मध्ये,
’ती’ आहे भिजलेल्या मा’ती’मध्ये.


'ती' आहे धनुष्यातुन सुटलेल्या ’ती’रामध्ये,
'ती' आहे तलवारीच्या धारदार पा’ती’मध्ये.


’ती’ आहे परंपरानिष्ठ स’ती’मध्ये,
’ती’ आहे विज्ञाननिष्ठ प्रग’ती’मध्ये.


’ती’ म्हणजे अप्सरेची कोमल नाजुक कां’ती’,
’ती’ म्हणजे मंदिराच्या गाभाऱ्यातली धीरगंभीर शां'ती'.


’ती’ लपते वाड्य़ाच्या पडक्या भिं’ती’मध्ये,
’ती’ लपते त्यावर उमललेल्या शेवं’ती’मध्ये.


’ती’ची अशक्य आहे गण’ती’,
’ती’ म्हणजे असंख्य मितींची भुमि’ती’.


’ती’ आहे अंधार दूर सारणारी पण’ती’,
’ती’ आहे वादळातही न विझणारी ज्योत मिणमिण’ती’.


’ती’ आहे जगाच्या सुरुवा’ती’ला,
’ती’ आहे जगाच्या अं’ती’....

कुठल्याश्या एका क्षणी....


(अखंडपणॆ जगभर स्वैर संचार करणाऱ्या मनाला उद्देशुन..)


कुठल्याश्या मंदिराच्या गाभाऱ्यात एक उनाड दिवा उगाच जळत होता...
रस्ता चुकुन खस्ता खाल्लेल्या भक्तांसाठी.


कुठल्याश्या वळणावर, झाडाची फ़ांदी उगाच हलत होती...
उडुन जाणाऱ्या पक्ष्यांना परत बोलावण्यासाठी.


कुठल्याश्या सांजवेळी उगाच ढग दाटुन आले...
सुर्य चंद्राच्या द्वंद्वाला प्रेक्षक नकोत का!


कुठल्याश्या विहीरीवर कारभारीण पाणी भरणारी...
दादल्याचा मागोवा घेत पांदीतुन धावणारी तिची नजर.


कुठल्याश्या नदीकाठी,बगळा ध्यान करणारा...
पोटोबा आणि विठोबा एकाचवेळी साधणारा.


कुठल्याश्या एका पानावर,पावसाचा थेंब पडलेला...
आभाळाचा संदेश घेउन धरणीला भिडलेला.


कुठल्याश्या एका क्षणी...मन स्वैर धावणारे....
कुठल्याश्या एका क्षणी...मन स्तब्ध होणारे...