Sunday, March 24, 2013

चहा...



पावसाळ्यातली सकाळ ती ओली,
नुकत्याच पडुन गेलेल्या पावसाने गच्ची ओलीचिंब झालेली,
संथ वाहणारा गार वारा आणि त्याला सोबत करणारा मातेरी आणि कुबटसा वास,
समोरच्याच झाडावर चिमणीच्या घरट्यात लगबग चालु आहे कसलीतरी,
वातावरणात जादु अशी की आपोआप कविता स्फुरावी,
पण गंमत काय आहे पहा,
कवितेचा जन्मच होत नाही जोपर्यंत हातात येत नाही वाफाळलेला चहा!

कट्ट्यावरचे दिवस प्रत्येकासाठीच सोनेरी असतात,
काहींना मिळतात जोडीदार येथेच, काही प्रकरणे मात्र सपशेल फसतात.
कोणाचा आनंद, कोणाचं दु:ख, कट्टा सगळं आरामात पचवतो,
सगळं पचवतो म्हणुन मी चक्क त्याला देवांच्या पंक्तीत बसवतो.
शोक दु:ख सारे सारे विरघळुन जातात येथे क्षणात,
नकळत विरघळत जाते खारी जशी गरमगरम चहात


स्थळ बघायला मी जावं,
तिच्या घरातलं वातावरण चमत्कारिक असावं,
सगळेजण गप्पा मारण्यात दंग आणि तेवढ्यात ती येते,
हलक्या रंगाची साडी,डोक्यावरला पदर सावरत,सवय नसावी कदाचित तिला
आमची पहिली नजरभेट अशी व्हावी,माझी स्वप्ने तिच्या पाणीदार डोळ्यात न्हावी,
असं वाटावं मला की ’मीच तुझा जहांगीर आणि तुच माझी नूरजहां,
जेव्हा होइल नकळत स्पर्श तुझा देताना मला वाफाळलेला चहा.

आयुष्याच्या शेवटल्या वळणावर आधार तो फक्त आठवणींचा आणि तुझा,
विरघळत गेलो तुझ्यात इतका की मी न राहिलो माझा
शेवटच्या श्वासांची हाक आता मला ऎकु यायला लागलीये
आयुष्यभर सगळ्यांचा हट्ट पुरवला आता यांचाही हट्ट पुरवायला हवा.
तुझ्या स्पर्शाची ऊब अनुभवायला अपुरा पडला जन्म हा,
डोळे मिटण्यापुर्वी,
मला फक्त प्यायचाय तुझ्या हातचा घोटभर चहा

No comments:

Post a Comment