Wednesday, March 23, 2011

पसारा

पसारा वाढतंच चाललाय,
पुस्तकांवर पुस्तकं चढतंच आहेत,
कोपर्‍यातली रद्दी हळुहळु पाय पसरायला लागलीये,
काचेवरच्या धुळीत डास कुस्ती खेळायला लागलेत,
परवाच्या जेवणातली शितं मुंग्यांनी सफ़ाचट करुन टाकलीयेत,
चला,तेवढंच अन्नदानाचं पुण्यं लाभलं पडल्या पडल्या.

सगळं कसं जडशीळ झालंय,
टीव्ही म्हणता रिमोट उचलवत नाही,
रेडिओ म्हणता कळ फ़िरववत नाही,
नुसतं सोफ़्यावर पडुन कुस्ती बघायची डासांची,
ऎकु वाटल्यास गुंगुं ऐकायची माश्यांची.

खिडकीत मस्त पक्षी बसलाय,
मनातच कौतुक केलं त्याचं,
पण गेला लगेच उडुन तो,
म्हणाला,नको रे बाबा माझं कौतुक करु,
कौतुकाचे कष्ट घ्यायला भाग पाडल्याबद्दल,
देशील मला शिव्याशाप.

स्थुलत्वाच्या सीमा मी केव्हाच पार केल्यात,
बधीरतेच्या कसोट्या कोळुन प्यायल्यात,
दगडाचे गुणधर्म मी पटापट आत्मसात करतोय,
शरीराबरोबर मनसुद्धा दगडात बदलवतोय.

आता नाही जाणवत संवेदना कसल्याच,
आता थंडीही वाजत नाही,गरमही होत नाही,
निष्पाप म्रुत्युच्या बातम्या ऐकुन पेटुन उठायला होत नाही.

चावला ढेकुण तरी म्हणतो चावुन घे,
या थंड रक्ताला तसाही काही अर्थ नाही,
माझ्या जीवावर निदान तु तरी जगुन घे.

No comments:

Post a Comment