परवा परवाचीच गोष्ट,
मित्रांबरोबर पायी फ़िरायला निघालो,
फिरत फिरत शाळेसमोरच्या रस्यावर पोचलो.
निवांत चालत असताना अचानक पाय थबकले.
शेजारच्या उजवीकडल्या बोळीत अलगद शिरले.
शिरताक्षणी पायाची चाल मंदावली.
पायाच्या चालीबरोबर काळ मंदावत गेला.
ती बोळ...अजुनही तशीच आहे.
समोरच्या भींतीवरचा रंग उडालेला,
बाजुच्या त्या खिडकीची काच अजुनही तशीच...तडे गेलेली.
खिडकीच्या छज्ज्यावरचं ते घरटं मात्रं काळानं खाउन टाकलेलं.
आणि....आणि त्यावर असलेली ती गच्ची!
गच्चीशेजारची ती छोटीशी खिडकी!!
कितीतरी वेळा मन शाळॆतुन उडुन या गच्चीवर बसलेलं,
तिची एक झलक पाहण्यासाठी आसुसलेलं.
आज का बरं आली नसेल ती शाळेत?
बरं नसेल का तिला?
का ग्रुहपाठ झाला नसेल?
मनाचा पक्षी उत्तर शोधत तिच्या खिडकीत जाउन बसायचा.
मंदावत चाललेला काळ कधीच थांबला होता.
आता उलट्यापावली भराभरा मागे पळत होता...
तिचं ते दोन सुंदर वेण्या घालुन येणं,
त्या वेण्य़ांबरोबर माझ्य़ा मनानं सुरपारंब्या खेळणं.
तिचं ते हळु आवाजात उत्तर सांगणं,
आणि तो आवाज कानाच्या आणि मनाच्या कुपीत सांभाळण्याचा माझा जीवापाड प्रयत्न करणं.
तिचं ते स्वच्छंदी,पैंजण वाजवत चालणं,
आणि माझ्या ह्रुदयाच्या ठोक्यांनी पैंजणाच्या ’छुम छुम’ बरोबर जुगलबंदी खेळणं.
सगळं किती सहज सुंदर निरागस!
त्या दिवशी खुप पाउस पडत होता.
शाळा सुटली.
ती थांबली होती, घाबरलेली थोडीशी.
छत्री नाही! पावसाची जाम भीती चेहऱ्यावर.
’हीच ती वेळ हाच तो क्षण’,माझ्या मनाचा आवाज.
"माझ्याकडे छत्री आहे,माझ्या वाटेवर तुझं घर आहे."
मी सांगायचं ते सांगितलं,ती समजायचं ते समजली.....
....त्या पंधरा मिनीटांत मी पावसांत निम्मा
आणि भावनांनी चिंब भिजुन गेलो.
पावसाची ओल ओसरुन गेली.
भावनांची ओल मात्र शाबुत अहे अजुनही.
आज ती बाहेर पडली डोळ्यांतुन.
शाळेचा शेवटच्या दिवसाचा हा प्रसंग,
नंतर कधीच दिसली नाही ती.
पण म्हणुन मनातलं तिचं अस्तित्व आजही किंचितही पुसट झालेलं नाही.
आयुष्यभराचा ठेवा ती त्या क्षणांमधे देउन गेली.
कोण जाणे कदाचित,,,
असाच ठेवा तिनेही जपला असेल तिच्या मनात,
माझ्या नकळत.....
No comments:
Post a Comment