Friday, March 25, 2011

कविता

हे कवितेचं फार अवघड आहे हो!
अंगाला तेल लावलेल्या पैलवानासारखं
हातात आली म्हणता म्हणता सटकुन जाते.

अगदी हाताच्या बोटापर्यंत काहीतरी पोचतं
पण लेखणीतुन कागदावर उतरायचं रहातं
उतु जाणाऱ्या शब्दांनी मग मनाची मळमळ चालु होते.

मग व्युवहरचना करावी लागते
एक एक शब्दाला फितुर करावे लागते
आंजारुन गोंजारुन ओळीला नमवावे लागते.

खुप कष्टांनंतर शब्दांचा गोतावळा जमतो
पण त्यांना जोडायचं कसं?
इथं विषयाचाच पत्ता नसतो!

चुळ्बुळणारे शब्द अस्वस्थ होऊन ढुसण्या देतात एकमेकांना
पळतात नुसते इकडं तिकडं वर खाली
काही हातात हात घालुन फेर धरतात.

अशातच कुठुनतरी अचानक विषय टपकतो
त्याच्या मागं असते मोठ्ठी शेपटी,हनुमानासारखी...
त्याला आपोआप चिकटतात सगळे शब्द,गोचिडासारखे...

एकदा चिकटले की मग हलवायचं म्हटलं तरी हलत नाहीत
पण गरजंच पडत नाही हलवायची
विषयाची ओढच असते एवढी
की अर्थ आपोआप चालुन येतो त्यांच्या पायाशी.

इतके कष्टं पडतात एक कविता करायला
कष्टं तसे शब्दांचे, पण श्रेयं मात्र कवीला
पण कवितेला श्रेयाचं घेणं देणं नसतं
तिचं कर्तव्य फक्त प्रेम देणं घेणं असतं.

एकदा उतरली कागदावर की तीन आत्मे त्रुप्त होतात
लिहीणारा आत्मा दिल्याने त्रुप्त होतो
वाचणारा आत्मा मिळाल्याने त्रुप्त होतो
कवितेचा आत्मा धर्मपालनाने त्रुप्त होतो.

No comments:

Post a Comment